‘टायटॅनिक’ आणि ‘लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ सारख्या ब्लॉकबस्टर आणि पुरस्कार विजेत्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे प्रसिद्ध अभिनेते बर्नार्ड हिल यांचे निधन झाले. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बर्नार्ड हिल यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. अभिनेत्री आणि बर्नार्ड हिलची सहकलाकार बार्बरा डिक्सनने त्यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली आहे.
अभिनेत्री बार्बरा हिने ट्विट केले की, ‘बर्नार्ड हिल यांच्या निधनाची घोषणा अत्यंत दुःखाने होत आहे. 1974 मध्ये आम्ही विली रसेलच्या ‘जॉन पॉल जॉर्ज रिंगो अँड बर्ट’ या शोमध्ये एकत्र काम केले होते. तो एक अप्रतिम अभिनेता होता, त्याच्यासोबत काम करणे हा सन्मान होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
बर्नार्ड हिल यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, एका रिपोर्टनुसार बर्नार्ड हिलचा मृत्यू रविवारी, ५ मे रोजी झाला. बर्नार्ड हिल यांच्या निधनाबद्दल त्यांच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे. अनेक यूजर्स त्यांच्या अभिनय कौशल्याचे कौतुक करत आहेत. अभिनयातील बारकावे त्यांना कसे माहीत होते हे अनेकांनी सांगितले आहे.टायटॅनिक चित्रपटामध्ये एक जहाजाचा कॅप्टन कसा असावा ते हिल यांनी नेमकेपणाने प्रेक्षकांसमोर आणले होते. एवढे महाकाय जहाज बुडत असताना धीरगंभीरपणे आपले कर्तव्य पार पाडणारा, शेवटपर्यंत प्रत्येक प्रवाश्याला वाचवण्याचा प्रयत्न करणारा त्यांचा कॅप्टन प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि मनात घर करणारा होता.
केट विन्सलेट आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 1997 च्या ऑस्कर-विजेत्या टायटॅनिक चित्रपटात बर्नार्ड यांनी कॅप्टन एडवर्ड स्मिथची भूमिका केली होती. त्या तडफदार भूमिकेसाठी त्यांचे आजही कौतुक होत आहे. ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’मध्ये त्यांनी किंग थिओडेनची भूमिका साकारली होती. बर्नार्डने अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे.त्यांनी 1983 च्या बॉईज फ्रॉम द ब्लॅकस्टफ शोसाठी बाफ्टा पुरस्कार देखील जिंकला होता. .तसेच नाटक मालिका वुल्फ हॉल (2015) मध्ये देखील संस्मरणीय कामगिरी केली होती. 2008 च्या वाल्कीरी आणि 2002 च्या द स्कॉर्पियन किंगमध्ये ते टॉम क्रूझसोबतही दिसले होते.