आज बहामास येथे सुरु असलेल्या जागतिक ॲथलेटिक्स रिलेमध्ये भारतीय पुरुष आणि महिलांचे 4×400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. महिलांच्या स्पर्धेत, रुपल चौधरी, एमआर पूवम्मा, ज्योतिका श्री दांडी आणि सुभा वेंकटेशन या चौघांनी 3 मिनिटे आणि 29.35 सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान पटकावले आहे. तर प्रथम स्थानी जमैका असून त्यांनी 3 मिनिटे 28 सेकंद मध्ये पूर्ण केले होते. यासह त्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपले स्थान नक्की केले आहे.
तर पुरुषांच्या 4×400 मीटर रिलेमध्ये, मोहम्मद अनस याहिया, मोहम्मद अजमल, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांच्या संघाने 3 मिनिटे आणि 3.23 सेकंद वेळेसह दुसरे स्थान पटकावले.
दुस-या फेरीत प्रत्येक तीन हीटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवणारे दोन संघ २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये प्रवेश करतील असे सांगितले जात आहे.
दुर्दैवाने दुस-या लेगचा धावपटू राजेश रमेश याला अचानक सामना दरम्यान क्रॅम्प आल्याने मध्यभागी माघार घ्यावी लागली आणि पहिल्या फेरीत सामना पूर्ण करता आला नव्हता. यासह भारताकडे आता पॅरिसला जाणारे 19 ट्रॅक आणि फील्ड ॲथलीट आहेत आणि या यादीत गतविजेता भालाफेक चॅम्पियन नीरज चोप्रा यांचा समावेश आहे. पॅरिस ओलीम्पिकमध्ये ॲथलेटिक्स स्पर्धा 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत.