झारखंडमध्ये आज ईडीने छापेमारी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईडीने झारखंडमध्ये छापेमारी केली आहे. झारखांमध्ये ग्रामीण विकास मंत्रालयमध्ये टेंडर कमिशन घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही छापेमारी केल्याचे समजते आहे. या प्रकरणात ईडीने मनी लॉन्ड्रींगचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलम गिर यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या घरातील नोकराच्या घराची झडती घेण्यात आली आहे. ज्यामध्ये २५ कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे. झडतीदरम्यान आवारात रोख रक्कम सापडली असून, त्याची मोजणी सुरू आहे. तब्बल ईडीने केलेल्या कारवाईचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी एका प्रचारसभेला संबोधित करताना ईडीने केलेल्या कारवाईचे कौतुक केले. बोलताना ते म्हणाले, ”आज झारखंडमध्ये नोटांचा पाऊस बघायला मिळत आहे. आता मला सांगा मी त्यांची चोरी पकडली, त्यांची कमाई बंद केली. मग ते मोदीला शिव्या देणारच ना. मला शिव्या दिल्या तरी मी हे काम करणारच. ”
ईडीने झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना फेब्रुवारी २०२३ मध्ये काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या अभियंता वीरेंद्र रामच्या प्रकरणात, ईडीच्या पथकाने झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या घरगुती नोकराच्या घरातून २५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली आहे.