सामाजिक कार्यकर्ते व सोशल मिडिया सेलिब्रिटी यांनी सोशल मीडियावरून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही प्रश्न विचारले आहेत. सुप्रिया सुळे या बारामतीच्या गेली १४ वर्ष खासदार आहेत. बारामती मतदारसंघ पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. ‘बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती’ हे समीकरण राज्यातील जनतेच्या मनात आत्तापर्यंत पक्के आहे असे सांगितले जाते. मागच्या तीन टर्म शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे याच बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नावाखाली सुप्रिया सुळे 2009, 2014 आणि 2019 अशा सलग तीनवेळा बारामतीच्या खासदार झाल्या आहेत.आता पुन्हा एकदा या लोकसभेच्या निवडणुकीत “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार असे नवे नाव असलेल्या वडिलांच्या पक्षासाठी त्या उमेदवार म्हणून आपले नशीब आजमावू बघत आहेत.
तुषार दामगुडे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या मतदारसंघात केलेल्या कथित विकासाबद्दल थेट प्रश्न विचारले आहेत. आणि त्यांची उत्तरे सुप्रिया सुळे यांच्याकडे मागितली आहेत. हे प्रश्न खालीलप्रमाणे आहेत.
सदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी अकरा प्रश्न :
१) भोर वेल्हा तालुक्यात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी किती सरकारी वाचनालये व अभ्यासिका आपण आजपर्यंत बांधल्या ?
२) महाराष्ट्राचे धंदे गुजरातमध्ये पळवून नेले जात आहेत अशी सांगून लोकांना मूर्खात काढणाऱ्या पुढाऱ्यांनी भोर वेल्हा तालुक्यातील तरुणांना नोकरी मिळावी म्हणून किती कारखाने या भागात आणले?
३) भोर वेल्ह्यात असलेल्या सरकारी रुग्णालये व सरकारी शाळा कॉलेजच्या दुर्दैवी अवस्था सुधारण्यासाठी तुम्ही आजपर्यंत काय प्रयत्न केले ?
४) आपल्या कार्यकाळात भोर वेल्ह्यात असलेल्या तहसील ऑफिस, पोलीस स्टेशन, तलाठी ऑफिस आणि तत्सम सरकारी कार्यालयात साध्या स्वच्छ मुताऱ्या आणि संडास आहेत का?
५) भोर वेल्हा तालुक्यात संपूर्ण हिंदू समाजाला वंदनीय अशा छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराजांशी संबंधित राजगड, पुरंदर,रायरेश्वर, सिंहगड अशा कैक मुख्य वास्तू असून तेथे अधिक पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारी पातळीवर तुम्ही आजपर्यंत काय केले?
६) वेल्हा तालुक्यातील गावांमध्ये जाण्यासाठी नसरापूरवरून येताना गेली कैक वर्ष नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून त्रास भोगावा लागतो तो टाळण्यासाठी तुम्ही आजपर्यंत काय केले?
७) वेल्हा तालुक्यातील सरकारी कार्यालयात येणाऱ्या हजारो गोरगरीब नागरिकांना साधं बसण्यासाठी व्यवस्थित खुर्च्या, पाणी व्यवस्था, ऊन लागू नये म्हणून साधं छप्पर तरी तुम्हाला आजपर्यंत करता आले काय ?
८) भोर वेल्ह्यात असलेले एसटी स्टॅण्ड हे बारामती प्रमाणे का झाले नाहीत?
९) वेल्हा तालुक्यातील मुलांसाठी ‘विद्या प्रतिष्ठान’प्रमाणे एकही शैक्षणिक संकुल का झाले नाही?
१०) भोर वेल्हा तालुक्यातील खेळाडूंसाठी बारामती मध्ये आहेत तशी क्रीडा संकुले, क्रिकेट स्टेडियम आजपर्यंत का बांधले गेले नाहीत?
११) वेल्हा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतांना आजपर्यंत पुरेसे पाणी का मिळू शकले नाही?
या प्रश्नांचे उत्तर देण्यास सुप्रिया सुळे अजून पुढे आल्या नसल्या तरी सोशल मीडियावर या प्रश्नांबाबत वाचकांनी आपआपली मते याबाबत मांडली आहेत. काहींनी म्हंटले आहे कि ह्या प्रश्नांमध्ये वर्णन केलेली भोर आणि वेल्ह्याची परिस्थिती खरी आहे तर काहींनी म्हंटले आहे कि कोणताही खासदार एवढी कामे करू शकत नाही.
मात्र या प्रश्नांमधून एक वास्तव समोर येते की, सुप्रिया सुळे यांनी आपला मतदारसंघ असे म्हणत प्रत्यक्षात फक्त बारामतीचाच विकास केला आहे का आणि मग भोर आणि वेल्हा यांच्या अश्या अवस्थेला जबाबदार कोण ?
तसे पहाता बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.म्हणजे सुप्रिया सुळेंनी आपल्या पूर्ण मतदारसंघाचा विकास करणे अपेक्षित होते.
उद्याच म्हणजे ७ मे ला शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार या पवार कुटुंबातली निवडणूक विशेष महत्वाची ठरणार आहे.महायुतीच्या उमेदवार म्हणून भावजय आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नणंद असा हा सामना उद्या मतांच्या रूपात रंगणार आहे.उद्याची ही लढाई केवळ ‘सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे’ अशी राहणार नसून, ‘अजित पवार विरुद्ध शरद पवार’ असेल,असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
एकूण काय बारामतीच्या उद्याच्या ह्या निवडणुकीच्या हायव्होल्टेज चुरशीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.