Ajit Pawar : आज (7 मे) देशात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचा तिसरा टप्पा पार पडत आहे. आजच्या या तिसऱ्या टप्प्यात 11 राज्यातील एकूण 93 जागांवर मतदान होत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 11 जागांवर आज मतदान पार पडणार आहे. यामध्ये सातार, कोल्हापूर, बारामती, सोलापूर, रायगड, उस्मानाबाद, सांगली, लातूर, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि हातकणंगले या जागांवर मतदान पार पडणार आहे.
तर आज सकाळी अनेक दिग्गज नेते मतदानासाठी केंद्राकडे निघाले आहे. काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये जाऊन मतदान केले. तर आता अजित पवार यांनी आपल्या आई आणि पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. त्यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर मतदान केलं.
दरम्यान, यंदा बारामतीमध्ये पवार विरूद्ध पवार अशी चुरशीची निवडणूक आहे. यामध्ये महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली असून महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत नणंद विरूद्ध भावजय अशी लढत होत आहे. तसेच 4 जूनला लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात बारामती लोकसभा निवडणूक दोन्ही पवारांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.