हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते आणि टीव्ही होस्ट शेखर सुमन यांनी आज दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पक्षाचे नेते विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या अभिनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि विनोद तावडे, अनिल बलुनी, जेपी नड्डा आणि अनुराग ठाकूर यांच्यासह भाजप नेतृत्वाचे आभार मानले आहेत.
“कालपर्यंत मला माहित नव्हते की मी आज इथे बसणार आहे कारण आयुष्यात अनेक गोष्टी जाणूनबुजून किंवा नकळत घडतात. मी इथे खूप सकारात्मक विचारसरणी घेऊन आलो आहे आणि मी देवाचे आभार मानू इच्छितो की त्याने मला इथे येण्याची आज्ञा दिली,” असे सुमन यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितले.
“एखादी व्यक्ती त्याच्या शब्दांवरून ओळखली जाते मात्र काही काळानंतर शब्दांना महत्त्व उरत नाही मग मात्र नुसतेच बोलणे आणि प्रत्यक्षात उतरवणे यातला फरक बघितला जातो. त्यामुळे मी इथे बसून कितीही वेळ भाषण केले तर त्याला अर्थ नाही मात्र मी त्यानंतर काय काम करेन हे जास्त महत्वाचे आहे.असे सुमन म्हणाले आहेत.
राजकारणात सक्रिय व्हायची शेखर सुमन यांची ही पहिलीच वेळ नाही, . २००९ मध्ये, त्यांनी काँग्रेसच्या बॅनरखाली पाटणा साहिबमधून लोकसभेच्या जागेसाठी निवडणूक लढवली होती, परंतु बॉलीवूड अभिनेते आणि भाजपचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांच्या विरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
शेखर सुमन यांनी अलीकडेच संजय लीला भन्साळी दिग्दर्शित वेब सीरिज ‘हीरामंडी: द डायमंड बझार’ मध्ये काम केले आहे जी नेटफ्लिक्सवरील मालिका सध्या खूप चर्चेत आहे. सुमन यांनी हीरामंडीमध्ये झुल्फिकार अहमदची व्यक्तिरेखा साकारली आहे.