भारतीय जनता पक्षाचे सर्वोच्च नेते आणिस्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या निवडणूक दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी सार्वत्रिक निवडणुकीत 400 चा आकडा पार करण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान मोदी देशभरात जोरदार प्रचार करून मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत. भाजपने आपल्या X हँडलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा निवडणूक कार्यक्रम शेअर केला आहे.
भाजपच्या एक्स हँडलनुसार, पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदा तेलंगणामध्ये जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी 9:30 वाजता तेलंगणातील करीमनगर येथील राज राजेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना करतील. यानंतर ते 10 वाजता करीम नगरमध्ये जाहीर सभेला संबोधित करतील. येथून दुपारी 12 वाजता वारंगलला पोचतील. ते वारंगलमध्ये एका विशाल जनसभेला संबोधित करतील. यानंतर ते आंध्र प्रदेशात पोहोचतील. पंतप्रधान मोदी दुपारी ३:४५ वाजता आंध्र प्रदेशातील राजमपेट येथे जाहीर सभेला संबोधित करतील. यानंतर सायंकाळी ७ वाजता विजयवाडा येथे होणाऱ्या रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत.
सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान काल पार पडले. तिसऱ्या टप्प्यात 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 93 जागांवर सरासरी 64 टक्के मतदान झाले. आता 13 मे रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाकडे सर्व नेत्यांचे लक्ष लागले आहे. चौथ्या टप्प्यात 10 राज्यांतील 96 जागांचा समावेश आहे. त्यामध्ये आंध्र प्रदेश, बिहार, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल.या राज्यांचा समावेश असणार आहेत.