Sharad Pawar : काल (7 मे) लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडला. त्यामुळे सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकिकडे निवडणुका सुरू असताना दुसरीकडे माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देशातील 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, असं मोठं वक्तव्य शरद पवारांनी केलं आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे.
‘द इंडियन एक्सप्रेसला’ दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणात मोठा बदल होणार असल्याचं भाकित केलं आहे. तसंच येत्या काही दिवसांमध्ये देशातील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलिन होतील, असा दावा शरद पवारांनी केला आहे. यावेळी शरद पवारांना त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्षही काँग्रेसमध्ये विलिन होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आमचा पक्ष हा नेहरू आणि गांधी यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आङे. त्यामुळे काँग्रेसची आणि आमची विचारसरणी एक आहे.”
पुढे ते म्हणाले, “आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलिन करायचा की नाही हे आम्ही आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय काही सांगू शकत नाही. त्यामुळे कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो आम्ही एकत्रितपणे घेऊ. तसेच असा काही निर्णय झालाच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो पचवायला खूप अवघड जाईल”, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होती असा दावा केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचं काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. तर यावरही शरद पवारांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंचे विचारही आमच्यासारखेच आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसारख्या समविचारी पक्षांबरोबर काम करण्यास उद्धव ठाकरे देखील सकारात्मक आहेत”, असेही पवारांनी सांगितले.