PM Modi On Congress : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामध्ये आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तेलंगणातील करीमनगरमध्ये एका सभेला संबोधित करताना काँग्रेसने अदानी-अंबानींना शिव्या देणं बंद का केलं? असा सवाल विचारत हल्लाबोल केला.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल की मागील पाच वर्षांपासून काँग्रेसचे शहजादे सकाळी उठल्या उठल्या जपमाळा जपायला सुरूवात करत होते. मग आता अचानक त्यांनी अदानी-अंबानींचं नाव घेणं बंद का केलं? असा सवाल पंतप्रधान मोदींनी उपस्थित केला.
राफेल प्रकरण जेव्हापासून शांत झाले आहे तेव्हापासून त्यांनी नवीन जपमाळ करण्यास सुरूवात केली आहे. आधी पाच वर्षे एकच जपमाळ जपायची. पाच उद्योगपती पाच उद्योगपती मग हळूच म्हणू लागले अदानी-अंबानी. पण निवडणुका जाहीर झाल्यापासून काँग्रेसने अदानी-अंबानींना शिव्या देणे बंद केले आहे, अशी टीका पंतप्रधान मोदींनी केली.
पुढे ते म्हणाले, काँग्रेसने या निवडणुकीत अदानी-अंबानींकडून किती पैसा जमा केला. तुम्ही किती पोती काळा पैसा घेतला? काँग्रेसपर्यंत टेम्पो भरून नोटा पोहोचल्या आहेत का? नेमकी काय डील झाली आहे की तुम्ही रातोरात अदानी-अंबानींना शिव्या देणं बंद केलं. यावरून तर तुम्हाला भरलेल्या टेम्पोमध्ये काही चोरीचा माल सापडला आहे. याचं उत्तर तुम्हाला देशाला द्यावं लागेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.