विमान कंपनी एअर इंडिया एक्सप्रेसची ७० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत उड्डाणे अचानक रद्द करण्यात आली आहेत एअरलाईन्सचे २०० कर्मचारी सामूहिक रजेवर गेल्यामुळे मंगळवार आणि बुधवारची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. या घटनेची नागरी विमान वाहतूक प्राधीकरणाने या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. क्रू मेंबर्सनी त्यांच्या सुटीचे कारण आजारपणाचे सांगितले आहे. यामुळे विमान कंपनीला ७० हून अधिक उड्डाणे रद्द करावी लागली. उड्डाणे रद्द करण्यात आलेल्या शहरांमध्ये कोची, कालिकत आणि बंगळुरू यांचा समावेश आहे.
याबाबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवक्त्याने सांगितले की, काही केबिन क्रू मेंबर्स मंगळवारी रात्रीपासून अचानक आजारी पडले. त्यामुळे काही उड्डाणे रद्द करावी लागली. पण हे का घडले ? हा प्रकार जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, यामुळे प्रवाशांची कमीत कमी गैरसोय व्हावी, असा आमचा प्रयत्न आहे. एअर इंडिया एक्सप्रेसने प्रवाशांना अचानक झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.
विमान कंपनीने म्हटले आहे की, उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रभावित झालेल्या प्रवाशांना एकतर एअरलाइनकडून पूर्ण परतावा मिळेल किंवा ते कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता त्यांचे फ्लाइट पुन्हा शेड्यूल करू शकतील. याव्यतिरिक्त, प्रवक्त्याने बुधवारी एअरलाइनसह उड्डाण करणाऱ्या प्रवाशांना विमानतळावर पोहोचण्यापूर्वी एअरलाइनशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे जेणेकरून ते फ्लाइटची खात्री करू शकतील.