लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या नेत्याने एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. या पक्षाचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर भाजपने देखील त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पित्रोदा यांनी आपल्या व्हिडिओत भारताच्या विविध भागात राहणाऱ्या व्यक्तींना आफ्रिकन, चिनी आणि अरबी असे संबोधले आहे. यावरून आता त्यांच्यावर टीका होत आहे.
सॅम पित्रोदा यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर, खासदार तेजस्वी सूर्या, भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला , भाजपा उमेदवार कंगना रानौत यांनी पित्रोदा यांच्यावर टीका केली आहे. पित्रोदा यांच्या वक्तव्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सर्वप्रथम प्रतिक्रिया दिली. त्यांनी x (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केले आणि लिहिले, ‘सॅम भाई, मी ईशान्येचा आहे आणि भारतीयासारखा दिसतो. आपण वैविध्यपूर्ण देश आहोत. आपण भिन्न दिसू शकतो पण आपण सर्व एक आहोत. आपल्या देशाबद्दल थोडे समजून घ्या!’
भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी आरोप केला की, राहुल गांधींचे गुरू असलेल्या व्यक्तीच्या या वर्णद्वेषी टिप्पण्या आहेत. पूनावाला म्हणाले, ‘हे राहुल गांधींचे शब्द आणि विचार आहेत कारण आजकाल राहुलसुद्धा फूट पाडा आणि राज्य करा, असे राजकारण करत आहेत की आधी ते जाती आणि भाषेच्या आधारावर फूट पाडतात आणि आता ते भारतीयांमध्ये फूट पाडत आहेत.”