रवीन्द्रनाथ टागोर यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी मोठ्या ठाकूर परिवारात झाला. एक गीतकार, साहित्यिक, शिक्षणतज्ञ, संगीत कार तत्वचिंतक, देशभक्त अशा विविध भूमिकांमधून रवीन्द्रनाथ यांनी भारतीय इतिहासावर आपला ठसा उमटवला आहे. नोबेल पारितोषिक मिळवणारी ही केवळ पहिली भारतीय व्यक्ती नाही तर हा पुरस्कार मिळवणारी पहिली युरोप बाहेरील व्यक्ती. जनगणमन आणि आमार बांगला ही गीते लिहून त्यांनी भारत आणि बांगलादेश या दोन देशांना आपापली राष्ट्रगीते दिली हाही एक विरळाच पराक्रम.
लहानपणी रवीन्द्रनाथ यांना घराबाहेर पडायला बंदी होती. घरातच आपल्या भावंडांसोबत संगीत, साहित्य, काव्य, शाळेतील विषय यांचा अभ्यास करीत. चार भिंतीत शिक्षण घेणे त्यांना आवडत नसे. त्यांचे वडील शांतिनिकेतनात घेऊन गेले. तिथे ते चांगलेच रमले. नंतर घरी राहूनच आपल्या पध्दतीने ते शिकले. शिक्षणासाठी दोन वर्षे लंडनला असताना पाश्चिमात्य संगीतही शिकले.
ठाकूर कुटुंबाची भारतीय, इंग्रजी आणि पर्शियन संस्कृती मिळून स्वतः ची वेगळी संस्कृती होती.
रवीन्द्रनाथांची स्वतंत्र अशी जीवन देवाची कल्पना होती. प्रत्येक माणसाच्या अंतरात जीवनदेव असतो अशी त्यांची धारणा होती. मात्र याची जाणीव प्रतिभावंतानाच होते. कला आनंद देणारी असून माणसाची ती प्राथमिक गरज आहे असे त्यांचे ठाम मत होते. सौंदर्य पूजन हा त्यांचा विशेष गुण होता. ते परिधान करीत असलेली वस्त्रे, उंची शाली मखमली टोप्या यातून त्यांची सौंदर्य द्रुष्टी प्रतीत होत असे. ते अतिशय देखणे होते. कुरुपता ही हिंसा व सुंदरता ही अहिंसा हे त्यांचे स्पष्ट मत होते.
आधुनिक लघु कथा लेखनाचा रवीन्द्रनाथांनी पाया घातला. राजा ओ रानी, चित्रा, डाकघर, प्रकृतिर प्रतिशोध ही त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. अवीट गोडीचे रवीन्द्र संगीत त्यांनी निर्माण केले. वयाच्या ६०व्या वर्षी मनातील उर्मी व्यक्त करण्यासाठी चित्रकलेला सुरुवात केली.
मुलांना निसर्गाच्या सानिध्यात शिक्षण मिळावे म्हणून १९०१ साली बोलपूर येथे आश्रमशाळा सुरू केली. या शाळेतच गुरुदेव ही उपाधी त्यांना मिळाली.
लघु उद्योगांना उत्तेजन देण्यासाठी रवीन्द्रनाथांनी श्रीनिकेतनची स्थापना केली. स्वदेशी वस्तू उत्तम आणि सुंदर बनतील, परदेशी मालापुढे टिकाव धरतील असा त्यांचा प्रयत्न होता. सरस्वती, लक्ष्मी आणि शांती यांची प्रतिष्ठापना केली.
स्वातंत्र्य चळवळीत ते सक्रिय होते. जालियनवाला हत्याकांडाच्या निषेधार्थ ‘सर’पदवी परत केली. स्त्री पुरुष समानता असावी आणि खेडी आत्मनिर्भर असायला हवीत हा विचार गांधीजींच्या आधी त्यांनी मांडला होता.
रवीन्द्रनाथ साक्षात्कारी पुरुष होते. परमतत्वाला जाणत होते. म्हणूनच त्यांच्या लेखणीतून गीतांजली येऊ शकली. गोरा, नौका डुबी, योगायोग, चौफेर बाली या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. गोरा ही कादंबरी टॉलस्टॉयच्या वॉर ॲन्ड पीसच्या तोडीची मानली जाते. रवीन्द्रनाथांनी ‘शिवाजी उत्सव’ ही दीर्घ कविता लिहिली आहे.
१९११मध्ये रवीन्द्रनाथांनी जनगणमन लिहिले. १९१२मध्ये इंग्रजी गीतांजली लिहिली आणि नोव्हेंबर १९१३ मध्ये त्यासाठी नोबेल पुरस्कार जाहीर झाला. ते खरेखुरे विश्व कवी होते. सगळ्या देशांना ते आपलेसे वाटत. हंगेरी मध्ये त्यांच्या हस्ते लावलेले रोप अजूनही आहे. ७ऑगस्ट १९४१ रोजी ते त्यांना आवडणाऱ्या मृत्यूला हसत हसत सामोरे गेले व अमर झाले.
सौजन्य -समिती संवाद,पश्चिम महाराष्ट्र प्रांत