Devendra Fadnavis On Sharad Pawar : आज (8 मे) माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे ज्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, असा खळबळजनक दावा शरद पवारांनी केला आहे. पवारांनी केलेल्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून जोरदार प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामध्ये आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या दाव्यावर खोचक अशी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस हे आज धुळ्यात आहेत. तर यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, “शरद पवारांना असं काही म्हणायचं असेल आणि त्यांच्या डोक्यात तसं काही चाललं असेल तर त्यांचा जो काही शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो काँग्रेसमध्ये विलिन करावा. यापूर्वीही शरद पवारांनी अनेकदा पक्ष तयार केले आणि ते काँग्रेसमध्ये गेले आहेत.”
“शरद पवारांनी आता संकेत दिले आहेत. त्यांना त्यांचा पक्ष चालवणे आता शक्य होणार नाही. त्यामुळे ते लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शरद पवारांनी नेमका काय दावा केला?
‘द इंडियन एक्सप्रेसला’ दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांच्या राजकारणात मोठा बदल होणार असल्याचं भाकित केलं आहे. तसंच येत्या काही दिवसांमध्ये देशातील प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ येतील किंवा काँग्रेसमध्ये विलिन होतील, असा दावा शरद पवारांनी केला. यावेळी शरद पवारांना त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा पक्षही काँग्रेसमध्ये विलिन होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “आमचा पक्ष हा नेहरू आणि गांधी यांच्या विचारसरणीवर चालणारा पक्ष आङे. त्यामुळे काँग्रेसची आणि आमची विचारसरणी एक आहे.”