लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या उमेदवारांसाठी देशभरात प्रचारसभा घेत आहेत. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेलंगणाच्या वारंगली येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. काँग्रेसने या राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे, असा आरोप मोदींनी काँग्रेसवर केला आहे. काँग्रेस नागरिकांना कशी फसवते ते तेलंगणाच्या नागरिकांना चांगलेच माहिती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंगली येथील प्रचारसभेत बोलत होते. बोलताना मोदी म्हणाले, ”१० वर्षांपूर्वी सत्तेत असताना काँग्रेसने केलेलं पाप कोणीही विसरू शकत नाही. देशातील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट होत असत. यावेळी दरवर्षी एक पंतप्रधान असा नवीन फॉर्म्युला इंडी आघाडीने लावला आहे. ते देशासाठी काही करू शकत नाहीत.”
पुढे बोलताना मोदी म्हणाले, ” आज आपण विकसित भारत आणि तेलंगणाचे स्वप्न पाहत आहोत. जगात सर्वत्र अस्थिरता, अशांतता आणि संकट आहे. अशा परिस्थितीत परिस्थिती, देशाची कमान चुकीच्या हातात जाऊ शकते का, म्हणून देश म्हणतोय ‘फिर एक बार, मोदी सरकार.” पंतप्रधान मोदी हे आपल्या प्रचारसभांमधून काँग्रेसवर आणि त्यांच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका करत आहेत.