लोकसभा निवडणूक मोठ्या उत्साहात देशभरात सुरु आहे. काल देशभरात ९४ जागांवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. अजून चार टप्प्यातील मतदान होणे बाकी आहे. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील ११ जागांवर मतदान पार पडले. काल मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनची पूजा केल्याने महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकवासला या परिसरातील मतदान केंद्रावर रुपाली चाकणकर पोहोचल्या होत्या. मतदान सुरू होण्यापूर्वी त्या औक्षणाचे ताट घेऊन तिथे आल्या होत्या. त्यांनी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनची पूजा केली. हा प्रकार मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांच्या लक्षात येताच ते देखील चक्रावले होते. अशा प्रकारे मतदान केंद्रात जाऊन ईव्हीएम मशीनची पूजा करणे नियमांत बसत नसल्याने रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पुण्याच्या सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये चाकणकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.