Amit Shah : आज (8 मे) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखीमपूरमध्ये एका प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल वर्मा यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला.
अमित शाह म्हणाले की, “काँग्रेस, सपावाले खोटा प्रचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि भाजपला बदनाम करत आहेत. जर मोदींना 400 जागा दिल्या तर ते आरक्षण संपवतील, असं विरोधक म्हणत आहेत. पण काँग्रेसने मागास प्रवर्गाचं आरक्षण काढून मुस्लिमांना 5 टक्के आरक्षण दिलं आहे. काँग्रेसने मागासांच्या आरक्षणाला धक्का लावण्याचं काम केलं आहे”, अशी टीका अमित शाह यांनी केली.
पुढे ते म्हणाले, “राम मंदिराला हे लोक बेकार म्हणत आहेत, त्यात तुम्ही जराही चूक केली तर हे लोक राम मंदिराला बाबरी नावाचं कुलूप ठोकतील. जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचं सरकार होतं तेव्हा तिथे गुंडराज सुरू होता. तिथे होळी, दिवाळीला वीज नसायची पण रमजानमध्ये 24 तास वीज असायची. त्यावेळी तेथील जमिनींवर कब्जे देखील केले जात होते”, असंही अमित शाह यांनी सांगितलं.