स्वामी चिन्मयानंद हे भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक विचारवंत आणि वेदान्त तत्वज्ञानाचे जगप्रसिद्ध विद्वान होते. हिंदू धर्म आणि संस्कृतीचे मूलभूत तत्व असलेल्या ‘वेदांत दर्शन’चे उत्तम प्रवक्ते होते. उपनिषद व गीता यावरील त्यांची भाष्ये आणि त्यांनी विकसित केलेला वेदांत अभ्यासाचा अभ्यासक्रम सध्याच्या संदर्भात वेदांत समजून घेण्यासाठी अद्वितीय आहे. स्वामींनी स्थापन केलेले ‘चिन्मय मिशन’ जगभर वेदांत तत्वज्ञानाचा प्रसार करत आहे. त्यांनी शेकडो संन्यासी व ब्रह्मचारींना प्रशिक्षण दिले. हजारो स्वाध्याय मंडळे स्थापन केली. समाजसेवेची अनेक कामे सुरु केली.
त्यांनी उपनिषद, गीता व आदि शंकराचार्यांच्या ३५हून अधिक ग्रंथांवर भाष्ये लिहिली होती गीतेवरील त्यांचे भाष्य सर्वश्रेष्ठ मानले जाते १९६४ साली हिंदू संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी पवई येथील स्वामींच्या आश्रमात विश्व हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली जिचे अध्यक्ष स्वामी चिन्मयानंद होते. स्वामींनी आदि गुरु शंकराचार्यांचाअद्वैतवाद जनमानसात आणला. आध्यात्मिक दिव्य तेजाने युक्त त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
स्वामी चिन्मयानंद सरस्वती यांचा जन्म ८ मे १९१६ रोजी केरळमध्ये झाला त्यांचे बालपणीचे नाव बालकृष्ण मेनन. मद्रास विद्यापीठात पदवी घेतल्यानंतर लखनौ विद्यापीठात साहित्य व कायद्यातील पदव्युत्तर पदव्या मिळवल्या. तत्कालीन प्रतिष्ठित वृत्तपत्र नॅशनल हेराल्ड मध्ये पत्रकार म्हणून काम केले. राष्ट्रीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. तुरुंगवास भोगला. मात्र स्वतः च्या जीवनाबद्दल ते अत्यंत असमाधानी व अस्वस्थ होते.
जीवन, मृत्यू आणि अध्यात्माचा खरा अर्थ या बद्दलच्या प्रश्नांनी त्यांना वेढले होते. ज्याची उत्तरे शोधण्यासाठी भारतीय आणि युरोपीय तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास त्यांनी सुरू केला. स्वामी शिवानंदांच्या लेखनाचा खोलवर प्रभाव पडल्याने बालकृष्ण मेनन यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला. १९४९ मध्ये स्वामी शिवानंदांच्या आश्रमात दाखल झाले. तेव्हा त्यांना ‘स्वामी चिन्मयानंद सरस्वती’नाव मिळाले ज्याचा अर्थ’परिपूर्ण चैतन्याच्या आनंदाने भरलेला’ असा होतो.
प्राचीन तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास ८वर्षे केल्यावर त्यांना जाणवले की आपल्या जीवनाचा उद्देश वेदांताचा संदेश पसरवणे व भारतात आध्यात्मिक पुन: जागरण करणे हा आहे.
आपल्या कार्याची सुरुवात स्वामींनी पुण्यात केली. देशातील प्रमुख शहरांमध्ये ज्ञान यज्ञ केले. चिन्मय मिशनच्या अंतर्गत सनातन धर्म प्रसारासाठी व मानव कल्याणासाठी देशविदेशात गीतेच्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला. त्यांच्या समोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते संवाद साधून आध्यात्मिक मार्गदर्शन करीत. मनुष्याला दैनंदिन जीवनात उत्तरोत्तर आनंदी व समाधानी बनवणे हे वेदांताचे उद्दिष्ट आहे. ते आपोआपच माणसाला आतून आध्यात्मिक जागृतीकडे घेऊन जाते यावर त्यांचा भर असे. गूढ तत्वज्ञान सोप्या व मार्मिक पध्दतीने समजावून सांगत. १९९३ साली शिकागो येथील जागतिक धर्म संसदेत स्वामींनी हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.
स्वामींच्या निधनानंतरही चिन्मय मिशन जगभर काम करत आहे. चिन्मय मिशनचे जागतिक प्रमुख स्वामी तेजोमयानंद यांच्या नेतृत्वाखाली ज्ञानदानाचे कार्य अव्याहतपणे चालू आहे.
रोहिणी कुलकर्णी
नाशिक
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत