जेडीएस नेते एचडी रेवण्णा यांना बुधवारी (8 मे) न्यायालयाने १४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. अपहरण प्रकरणी शनिवारी ४ मे रोजी त्यांना एसआयटीने अटक केली होती. आज त्यांची कोठडी संपणार होती. त्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. एचडी रेवन्ना आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध आयपीसी कलम ३६४ ए, ३६५ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही.
जनता दल (एस) चे नेते प्रज्वल रेवण्णा यांचा शोध घेण्यासाठी कर्नाटक सरकारने केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ला इतर देशांची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. रेवन्नावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) आज कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना रेवण्णाविरोधात सुरू असलेल्या तपासाबाबत माहिती दिली. या बैठकीनंतर सीबीआयशी संबंधित हे पाऊल उचलण्यात आले आहे. कर्नाटकचे राजकारण दिवसेंदिवस वेगवगेळ्या घटनांमुळे सारखे बदलत आहे. अनेक महिलांकडून लैंगिक छळाचे आरोप झालेले माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा यांच्या अडचणीत वाढ होत आहे.