SRH vs LSG : IPL 2024 च्या 57 व्या सामन्यात काल (8 मे) सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा 10 गडी राखून पराभव केला. त्यामुळे त्यांनी या मोसमात प्लेऑफ गाठण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लखनौचा संघ 20 षटकांत 4 गडी गमावून 165 धावाच करू शकला.तर हैदराबादने एकही विकेट न गमावता केवळ 9.4 षटकांत हे लक्ष्य गाठले. हैदराबादच्या या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा संघ आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
लखनौकडून मिळालेल्या 166 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या हैदराबादने अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेडने संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. अभिषेकलाही वैयक्तिक 25 धावांच्या जोरावर जीवदान मिळाले. त्याचवेळी हेडने अवघ्या 16 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले, जे त्याचे आयपीएलमधील 5 वे अर्धशतक आहे. दोन्ही फलंदाजांनी पॉवरप्लेमध्ये पहिल्या सहा षटकांतच 107 धावांची शतकी भागीदारी केली आणि लखनौला प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढले.
हेडनंतर अभिषेकने 19 चेंडूत आयपीएलमधील सहावे अर्धशतक पूर्ण केले. अभिषेकने 28 चेंडूंत आठ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद 75 धावा केल्या, तर हेडने 30 चेंडूंत आठ चौकार आणि तितक्याच षटकारांच्या मदतीने नाबाद 89 धावांची खेळी केली.
सनरायझर्स हैदराबादचा 12 सामन्यांमधला हा सातवा विजय आहे. संघाचे आता 14 गुण झाले आहेत आणि ते +0.406 निव्वळ धावगतीने तिसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत. यासह संघाने प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. लखनौला 12 सामन्यांमध्ये सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले असून आता हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे.