Sharad Pawar : काल (8 मे) माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी लवकरच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील, असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता शरद पवारांनी त्यांच्या या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. काँग्रेसमध्ये सरसकट पक्ष विलीन होणार नाहीत, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
शरद पवार म्हणाले की, “मी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचं काही बोललोच नाही. आम्ही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात एकत्र आहोत. 2001 पासून राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र काम करत आहे. आम्ही मागच्या मंत्रिमंडळातही एकत्र होतो. त्यात आम्ही अनेक मतदारसंघामध्ये अनेक ठिकाणी जिथे काँग्रेसचा उमेदवार तिथे राष्ट्रवादीचा उमेदवार आणि जिथे राष्ट्रवादीचा तिथे काँग्रेसचा उमेदवार दिला. एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आम्ही एकत्र काम करत आहोत.”
“राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष काँग्रेस पक्षाच्या विचारांच्या जवळ जाणार पक्ष आहे. त्यामुळे आम्ही अधिक एकत्र येऊन काम करण्याची आमची भावना वाढली तर त्यात आश्चर्य वाटायला नको”, असं शरद पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “आम्ही काहीही झालं तरी गांधी-नेहरूंचा विचार सोडणार नाही. तसेच मी उद्धव ठाकरेंच्या पक्षाबाबत काहीही बोललेलो नाही. त्यांचा स्वतंत्र पक्ष असून त्यांना स्वतंत्र अस्तित्व आहे”, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.