बाबा केदारनाथ धामचे (Kedarnath Dham) दरवाजे उद्या म्हणजे 10 मे पासून खुले होणार आहेत. दर्शनाची आस लावून बसलेल्या लाखो भक्तांसाठी आणि पर्यटकांसाठीही हा महत्त्वाचा क्षण असणार आहे . केदारनाथचे कपाट (Kedarnath Temple) खुलण्याची सर्वतोपरी तयारी सुरु आहे. मंदिर परिसरात फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रशासनाकडून चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
पूजा आणि मंत्रोच्चाराच्या माध्यमातून केदारनाथ धामचे द्वार औपचारिकपणे उघडण्याची पूर्वतयारी सुरू झाली आहे .बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराला ४० क्विंटल फुलांनी सजवण्यात आले आहे
तत्पूर्वी, भगवान केदारनाथची पंचमुखी डोली गौरीकुंड येथील गौरामाई मंदिराच्या तिसऱ्या मुक्कामावरून केदारनाथ धामकडे रवाना झाली. 6 मे रोजी देवडोली आपल्या मुक्कामासाठी श्री विश्वनाथ मंदिर गुप्तकाशी येथून श्री ओंकारेश्वर मंदिर उखीमठ येथे पोहोचली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 मे रोजी फाटा येथे पोहोचली.
या वर्षी, चार धाम यात्रा 10 मे रोजी सुरू होणार आहे. यातली चारपैकी तीन मंदिरे – गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथ भाविकांसाठी १० मे पासून खुले होतील. तर 12 मे रोजी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडतील
बाबा केदारनाथ धामचे दरवाजे उद्या सकाळी 7 वाजेपाासून उघडण्यात येतील. देशविदेशातून भाविक यासाठी दाखल होत आहेत.मात्र बाबा केदारनाथ मंदिर बद्रीनाथ-केदारनाथ धाम समितीकडून दर्शनासाठी काही नियम लागू करण्यात आले आहेत.
बद्रीनाथ-केदारनाथ धाम समितीकडून लागू करण्यात आलेले नियम खालीलप्रमाणे आहेत.
मंदिर समितीकडून भाविकांसाठी कडक ड्रेसकोड लागू नाही. मात्र, मर्यादेत राहून कपडे घालण्याचे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे.
तसेच केदारनाथ धाम मंदिर परिसरात मोबाईल वापरण्यावर निर्बंध असणार आहेत.
मंदिर परिसरात फोटो काढण्यास, रिल बनवण्यास किंवा कोणताही व्हिडीओ शूट करण्यास मनाई आहे. गेल्या वर्षी काही आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.