Supriya Sule On Ajit Pawar : आज (9 मे) शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा पार पडल्या. महायुतीच्या सभेत अजित पवारांनी जनतेला संबोधित करताना शरद पवारांवर निशाणा साधला. “जर मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती. पण मी फक्त साहेबांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही मला डावललं गेलं, हा कोणता न्याय आहे?” असा सवाल अजित पवारांनी केला आहे. तर अजित पवारांच्या या वक्तव्यावर आता सुप्रिया सुळेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
सुप्रिया सुळेंनी आज शिरूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभा घेतली. यावेळी अजित पवारांवर निशाणा साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सध्या आपला पक्ष फुटला, पक्ष चोरला वगैरे वगैरे सुरू आहे. पण आजही तेच म्हणते की, प्यार से मांगा होता तो सबकुछ दे देते. नाती तोडायला ताकद लागत नाही तर नाती जोडायला ताकद लागते. तसेच मंत्रीपद महत्त्वाचं की निष्ठा महत्त्वाची? हे तुम्ही सांगा”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुढे सुळेंनी अजित पवारांच्या जर मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती या वक्तव्याचा समाचार घेतला. “मला त्यांचा स्वभाव माहिती आहे. तुम्हीच तुलना करा ना? कोणालं काय मिळालं याचा हिशोब करून पाहा. यामध्ये मला काय मिळालं आणि दादांना काय मिळालं. सगळं तर तुमच्या समोर आहे. त्यामुळे याचं उत्तर खूप सोप्प आहे”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.