KL Rahul : आयपीएल 2024 मध्ये लखनौ सुपर जायंट्सला काल (8 मे) सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर हैदराबाद संघाकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी तुफान खेळी केली आणि या दोघांनी अवघ्या 9.4 षटकात 167 धावा करत इतिहास रचला. त्यामुळे लखनौ संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
लखनौचा हा सलग दुसरा पराभव असून या पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. लखनौची सध्याची स्थिती आहे की एक पराभव आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जवळपास संपल्या आहेत. लखनऊच्या 10 विकेट्सनी झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका सर्वांसमोर कर्णधार केएल राहुलवर आपला राग काढताना दिसले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://twitter.com/srikant5333/status/1788258261533114578
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, संजीव गोयंका केएल राहुलला रागाने काहीतरी बोलताना दिसत आहेत. यावेळी केएल राहुल खूपच अस्वस्थ दिसत आहे. तर केएल राहुलच्या चेहऱ्यावर निराशाही स्पष्ट दिसत होती. यानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर आले आणि केएल राहुल निघून गेला. लँगर आल्यानंतरही संजीव गोयंका यांचा राग कमी झाला नाही आणि त्यांनी प्रशिक्षकासमोरही आपले मत मांडणे सुरूच ठेवले. संजीव गोएंका यांच्या या वृत्तीवर चाहते जोरदार टीका करत आहेत.