Amit Shah : तेलंगणातील भोंगीर येथे जाहीर सभेला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजप पुन्हा सत्तेत आल्यास एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणात वाढ करण्यात येईल, असे म्हटले आहे. यासोबतच देशातील अल्पसंख्याकांना दिलेले आरक्षण रद्द करण्यात येणार असल्याची घोषणाही शाह यांनी केली.
यावेळी अमित शाह म्हणाले. काँग्रेसला खोट्याच्या आधारे निवडणूक लढवायची आहे. 10 वर्षांपासून पंतप्रधान मोदी देश चालवत आहेत आणि ते आरक्षण रद्द करण्याबाबत कधीच बोलले नाहीत. पण भाजप सत्तेत आल्यास आरक्षण रद्द होईल, असा आरोप काँग्रेस करत आहे. काँग्रेसने एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाचा हक्क लुटला आणि अल्पसंख्याकांना चार टक्के आरक्षण दिल्याचा दावा शाह यांनी केला.
भाजपने गेल्या निवडणुकीत तेलंगणातून चार जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी भाजप लोकसभेच्या दहा जागा जिंकेल, असा विश्वासही अमित शाह यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, भाजपच्या जाहीरनाम्यात मोदींची हमी नमूद करण्यात आली आहे, पण राहुल गांधींची हमी फार काळ टिकणार नाही. राहुल गांधींनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाला 15 हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही, अशी टीका अमित शाह यांनी केली.
काँग्रेस, बीआयएस आणि एआयएमआयएमवर निशाणा साधत शाह म्हणाले की, हे सर्व पक्ष मिळून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोध करतात. तसेच हे विरोधी पक्ष तिहेरी तलाक परत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शाह यांनी केला.