इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काल असे सांगितले आहे, की, गरज पडल्यास त्यांचा देश हमासविरुद्धच्या युद्धात ‘एकटा उभा’ राहील. त्याचवेळी, गाझाच्या दक्षिणेकडील शहर रफाहमध्ये लष्करी कारवाई करण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक शस्त्रे असल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे.
नेतन्याहू यांचे हे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या इशाऱ्यानंतर आले आहे, ज्यात बायडन म्हणाले की, दक्षिण गाझा शहर रफाहवरील हल्ल्यासाठी अमेरिका इस्रायलला शस्त्रे पुरवणार नाही. आम्हाला एकटे उभे राहावे लागले तर आम्ही एकटे उभे राहू, असे इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले. तसेच गरज पडली तर आम्ही पूर्ण ताकदीने लढू असेही ते म्हणाले आहेत.
इस्रायलचे लष्करी प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “लष्कराकडे जे ऑपरेशन्सचे नियोजन आहे त्यासाठी शस्त्रे आहेत आणि आमच्याकडे रफाहमधील ऑपरेशनसाठी आवश्यक असलेली शस्त्रे देखील आहेत.”
डॅनियल यांची ही टिप्पणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या विधानानंतर आली आहे ज्यात त्यांनी म्हटले होते की, हमासचा शेवटचा गड असलेल्या रफाह येथे लष्करी कारवाईसाठी अमेरिका शस्त्रे पुरवणार नाही. इस्रायलचे अमेरिकेशी जवळचे संबंध आहेत आणि मतभेद बंद दरवाजाआड सोडवले पाहिजेत.असे डॅनियल यांनी म्हंटले आहे.