Suresh Jain : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एकिकडे लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना दुसरीकडे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. कारण माजी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश जैन यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे.
माजी मंत्री सुरेश जैन यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिली आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला असून त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं आहे.
सुरेश जैन यांनी राजीनाम्याच्या पत्रात लिहिलं आहे की, “मी युवावस्थेत म्हणजेच 1974 पासून राजकारणात सहभाग घेत आलो आहे. 1980 पासून मी सक्रीय राजकारणात प्रवेश केला आहे. तसेच 34 वर्ष मी विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलंय आणि बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास दाखवून शिवसेनेच्या माध्यमातून मला जनतेच्या सेवेसाठी सर्वप्रथम मंत्रीपद देऊन मी करत असलेल्या चांगल्या कामाची पावती दिली होती.”
“वयोमानानुसार आणि तब्येतीच्या कारणामुळे मी हळूहळू सक्रीय राजकारणातून बाहेर पडलो. आता आयुष्याच्या या अंतिम टप्प्यात मी सक्रीय राजकारणात कोणताही भाग न घेता निवृत्त व्हायचे ठरवले आहे. त्यामुळे आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्राथमिक सदस्यतेचा राजीनामा सादर करत आहे”, असे सुरेश जैन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सुरेश जैन यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी राजकारणात आल्यानंतर सलग 34 वर्षे आमदार पद सांभाळलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरेश जैना यांना पहिल्यांदा मंत्रिपद दिलं होतं. तर 2014 पासून ते प्रकृतीच्या कारणास्तव राजकारणातून बाहेर पडले होते.