Narendra Dabholkar Murder Case : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल अखेर लागला आहे. तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणी विशेष न्यायालयाने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन आरोपींना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना पाच लाख रूपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
न्यायालयाने शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवले असून डॉ. वीरंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. हा मोठा निकाल विशेष न्यायाधीश पी.पी.जाधव यांनी सुनावला.
आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. तसेच पोलिसांनी त्या दोघांविरोधातील सक्षम पुरावे न्यायालयात सादर केले होते. त्याआधारे न्यायाधीश जाधव यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत आहे, असे निकालामध्ये नमूद केले आहे.
या प्रकरणात तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. कारण डॉ. वीरंद्रसिंह तावडे याचा या प्रकरणात हेतू दिसून आला होता आणि त्याच्यावर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. पण त्याच्याविरोधात गुन्हा सिद्ध करण्यास पोलीस अपयशी ठरले. तर पुनावळेकर आणि भावे यांच्या विरोधातही सक्षम पुरावे सादर करण्यात पोलीस अपयशी ठरले, त्यामुळे या तिघांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.