अक्षय तृतीया अर्थात वैशाख शुध्द तृतिया हा हिंदू धर्मातला एक पवित्र आणि मांगल्याचा दिवस. अक्षय याचा अर्थच असा की जे संपणार नाही जे कधीही नष्ट होणार नाही ते. प्रत्येक व्यक्तीला आपला आयुष्यामध्ये अन्नपूर्णा लक्ष्मी,सरस्वती या आदिशक्तीच्या रुपांची कृपा असावी अस वाटत. आणि त्या अक्षय रहाव्यात अस वाटत. हे सहाजिकच नैसर्गिक आहे. आणि म्हणूनच ज्या गोष्टी अक्षय रहाव्या असं मनापासून वाटतं त्या गोष्टी पूजनाचा हा दिवस.
हा दिवस हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानला जातो. अनेक अत्यंत चांगल्या गोष्टी ह्या दिवशी घडल्या असे दाखले आपल्याला आपल्या संस्कृती आणि परंपरेमध्ये मिळतात.
भगीरथाने जी अत्यंत प्रयत्न करून गंगा पृथ्वी वरती आणली तो पृथ्वीवरती गंगावतरणाचा दिवस म्हणजे *अक्षय तृतीया*
भगवान विष्णुंचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म दिवस.
कुबेराने महादेवाला प्रसन्न करून घेऊन त्याच्यावरती कायम लक्ष्मीची कृपा राहिल असं वरदान मागितल तो दिवस सुद्धा हा *अक्षय तृतीयेचा*
कृष्ण सुदामा भेट, ही भेट सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशीच झाली. खरं म्हणजे गरीब असणारा सुदामा कृष्णा कडून काहीतरी आर्थिक सहाय्य मिळावं या हेतूने कृष्णापर्यंत पोहोचला होता. पण तरीसुद्धा अत्यंत संकोच्यामुळे कृष्णाला मनातली गोष्ट तो सांगू शकला नाही.पण त्यांनी प्रेमाने नेलेला पोह्यांचा खाऊ मात्र श्रीकृष्णाला खूप आवडला.आणि त्यातून त्यांनी सुदाम्याचं मन जाणलं. आणि सुदाम्याला अपरंपार धनसंपत्ती लाभली तो दिवस सुद्धा *अक्षय तृतीया*
महर्षी व्यासांनी महाभारत लिहायला सुरुवात केली तो सुद्धा *अक्षय तृतीयेचाच* अर्थात हे महाभारत व्यासांनी सांगितलं आणि गणपतीने लिहील
ह्या दिवशी दान करावं आपण जितकं द्यावं त्याच्या कैकपट आपल्याला लाभ होतो अशी श्रध्दा आहे.
या दिवशी आपण जे खरेदी करू ती गोष्ट जमीन,घरदार ,सोनं नाणं, आपल्याकडे अक्षय राहील अस मानतात.अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी मांगल्याचा असतो या दिवशी मंगल घटाची पूजा केली जाते
जो घट धनधान्य, संपत्ती यांनी संपूर्ण भरलेला असताे.
ह्या दिवशी लक्ष्मीची पूजा विष्णूसहित करतात या दिवसांमध्ये वातावरणाशी सुसंगत असलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. ज्यामधे आंब्याचा रस, कैरीचं पन्ह, चिंचगुळाचे पन्ह, भिजलेली हरभऱ्याची डाळ गोडधोड पदार्थ यांचा समावेश असतो
काही भागांमध्ये आपल्या पूर्वजांसाठी तर्पण करण्याची सुद्धा प्रथा आहे. भारताच्या अनेक भागांमध्ये हा दिवस वेगवेगळ्या प्रकाराने साजरा केला जातो
ओरिसामध्ये रथयात्रेचा आयोजन केलं जातं
बंगालमध्ये या दिवसाला हलकता* असे म्हणतात ह्या दिवशी नवीन हिशोबांच्या वह्यांची सुरुवात करण्यात येते.
महाराष्ट्रामध्ये तीज म्हणून साजरा करतात ह्या दिवशी चैत्रगौरीच्या व्रताची त्या उत्सवाची सांगता असते.
ह्या दिवशी शेतकरी आपलं शेत नांगरतात आणि त्यामध्ये पण अशीच भावन आहे आपण चार दाणे ह्या जमिनीमध्ये जर पेरले तर भरघोस पीक जमीन परत आपल्याला देते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी शेत नांगरून शेताची ही पूजा केली जाते.
हा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्तांमधला एक मुहूर्त म्हणून अत्यंत महत्त्वाचा आहे या दिवशी आपण जे करू ते अक्षय राहतं असे भावना असल्यामुळे आपण नक्कीच चांगल्या गोष्टींच्या व्रताची सुरुवात या दिवसापासून करूया.
आपले सण हे विज्ञान, वातावरण, आणि मानवी मनाची मानसिकता या सर्वांचा विचार करून नियोजले आहेत. संस्कृती ,परंपरा आपण पुढच्या पिढी पर्यंत पेहचवुयात आपणा सर्वांना या अक्षय तृतीया दिवसाच्या मंगल आणि पवित्र शुभेच्छा.
शुभांगी देवधर ,नाशिक
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत