Amol Kolhe : अभिनेते अमोल कोल्हे हे प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली होती, त्यामुळे ते महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत. तसेच आजही त्यांच्या या भूमिकेचं मोठ्या प्रमाणात कौतुक होतं. तर आता अमोल कोल्हेंनी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील पाच वर्ष अभिनय क्षेत्रात ब्रेक घेण्याची तयारी आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
शिरूरच्या जनतेचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि मतदारसंघातील अनेक प्रोजेक्ट मार्गी लावायचे आहेत. या सर्व कामांमुळे अभिनय क्षेत्रासाठी जास्त वेळ मिळणे शक्य नाहीये. तसेच सध्याच्या पाच वर्षांच्या काळामध्येही मी अभिनयासाठी जास्त वेळ दिला नाही. तर आता मला पुढील 5 वर्ष महाराष्ट्रातील आणि मतदारसंघातील विषयांना प्राधान्य द्यायचं आहे, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.
गेल्या पंधरा वर्षांमध्ये एकही प्रकल्प शिरूरमध्ये आलेला नाही, पण अवघ्या 5 वर्षांमध्ये अनेक प्रकल्प या ठिकाणी मार्गी लागले आहेत. तसेच हे प्रकल्प प्रत्यक्षात येणं आणि त्याला वेळ देणं गरजेचं आहे. त्यामुळे मालिका विश्वात काम करताना एवढा वेळ देणं शक्य नसून अभिनयाला पाच वर्ष ब्रेक द्यावा लागणार आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले.