Mohammed Shami On Sanjiv Goenka : बुधवारी (8 मे) झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. प्रथम फलंदाजी करताना लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादला विजयासाठी 166 धावांचे लक्ष्य दिले होते. यानंतर हैदराबाद संघाकडून अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड यांनी तुफान खेळी केली आणि या दोघांनी अवघ्या 9.4 षटकात 167 धावा करत इतिहास रचला. त्यामुळे लखनौ संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या लखनौच्या आशांना मोठा धक्का बसला आहे.
लखनौच्या 10 विकेट्सनी झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्स फ्रँचायझीचे मालक संजीव गोयंका सर्वांसमोर कर्णधार केएल राहुलवर आपला राग काढताना दिसले. काल हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, ज्यामध्ये संजीव गोयंका यांनी केएल राहुलला मैदानातच सुनावलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गोयंका यांच्यावर नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली.
आता या प्रकरणावर टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने प्रतिक्रिया दिली आहे. शमी या विषयावर बोलण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. शमी म्हणाला, ‘ही लाजिरवाणी गोष्ट आहे की गोयंका यांनी मैदानावर जसे राहुलशी बोलणे निवडले.
क्रिकबझसोबतच्या संभाषणात शमी म्हणाला, ‘खेळाडूंचा आदर केला जातो आणि मालक म्हणून तुम्हीही आदरणीय व्यक्ती आहात. बरेच लोक तुम्हाला पाहत आहेत आणि तुमच्याकडून शिकत आहेत. कॅमेऱ्यासमोर या गोष्टी घडत असतील तर ती शरमेची बाब आहे.
पुढे शमीने अशा संभाषणांना सार्वजनिक करण्याऐवजी ड्रेसिंग रूम किंवा टीम हॉटेलमध्ये मर्यादेत ठेवण्यावर भर दिला. तो म्हणाला, ‘जर तुम्हाला हे करायचे असेल तर अनेक मार्ग आहेत. आपण ड्रेसिंग रूम किंवा हॉटेलमध्ये असेच करू शकता. मैदानावर हे करण्याची गरज नव्हती. अशी प्रतिक्रिया देऊन तुम्ही लाल किल्ल्यावर झेंडा फडकवला नाही”, असंही शमी म्हणाला.