दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी ईडी कोठडीत आहेत. २१ मार्च रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. तसे आज अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सुप्रीम कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. त्यामुळे अरविंद पुन्हा एकदा निवडणुकीच्या प्रचारात दिसण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना जामीन मंजूर करताना काही अटी-शर्ती घातल्या आहेत. तर त्याबद्दल जाणून घेऊयात
सुप्रीम कोर्टाने केजरीवाल यांना १ जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टाने त्यांना काही अटींचे पालन करण्यास सांगितले आहे. केजरीवाल यांना कोर्टाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालय किंवा सचिवालयात जाण्यास केजरीवाल यांना मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही फाईलवर केजरीवाल यांना सही करता येणार नाहीये. अगदीच आवश्यक असल्यास राज्यपालांची परवानगी घ्यावी लागणार आहे. ज्या प्रकरणात त्यांना अटक झालेली आहे त्याबद्दल माध्यमांमध्ये बोलायचे नाही. कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क करू नये असे नियम केजरीवालांना घालून देण्यात आले आहेत.