Maharashtra Rain : आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. पुणे, जालना, अहमदनगर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून 29 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. एकिकेड मुसळधार पाऊस होत असताना या पावसाचा परिणाम लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावर झाला आहे. पावसामुळे अनेक प्रचारसभांवर पाणी फेरले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी राज्यांमध्ये जोरदार प्रचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. पण, अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे या सभांवर पाणी फेरले आहे.
अनेक ठिकाणी पावसामुळे प्रचारसभा रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांची जालन्यात सभा होणार होती. तर आता अवकाळी पावसामुळे त्यांचा जालना दौरा रद्द करण्यात आला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंची आज पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी सभा होत आहे. पण अचानक आलेल्या या पावसामुळे ही सभा आता अडचणीत सापडली आहे. तसेच पुण्यात आज शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची देखील सभा होणार होती, मात्र पावसामुळे त्यांचीही सभा रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या देशातील वातावरण सतत बदललेले पाहायला मिळत आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात काही ठिकाणी वरुणराजा कोसळत आहे. पुढील काही तासांमध्ये राज्यात काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर या जिल्ह्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.