तिहार तुरुंगातून अंतरिम जामिनावर सुटल्यानंतर आज आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेसमधील हनुमान मंदिरात प्रार्थना केली.यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सुनीता केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान होते.
आपल्या जामीनाबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की, “कोट्यवधी लोकांच्या प्रार्थना आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर परत आल्याने मला आनंद होत आहे”.
आज मुख्यमंत्री केजरीवाल हनुमानजींचे आशीर्वाद घेण्यासाठी येथे येतील आणि नंतर पत्रकार परिषदेसाठी पक्ष कार्यालयात जातील. दक्षिण दिल्लीत दोन रोड शो ,पूर्व दिल्लीतील रोड शो करून ते निवडणूक प्रचाराला गती देतील.असे त्यांच्या पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
तब्बल ४० दिवसांपेक्षा जास्त दिवस तिहार तुरुंगात काढल्यानंतर आज केजरीवाल यांचे समर्थक आणि कुटुंबीयांनी जोरदार स्वागत केले आहे. .
नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन 1 जूनपर्यंत असेल. अरविंद केजरीवालांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी 4 जूनपर्यंत जामीन मिळावा अशी मागणी केली होती. मात्र, प्रचार 48 तास अगोदर संपतो, असं सांगत न्यायालयाकडून केजरीवालांना 1 जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आला आहे. मात्र अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान या खटल्यावर काहीही बोलू शकत नाहीत, तसेच ते निवडणूक प्रचारात भाग घेऊ शकतात परंतु मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहू शकत नाहीत.जामीनाच्या अटींनुसार केजरीवाल दिल्ली दारू घोटाळ्यातील त्यांच्या भूमिकेबद्दल काहीही भाष्य करू शकत नाहीत.
२१ मार्च रोजी अंमलबजावणी संचालनालयाने अबकारी धोरण प्रकरणात केजरीवाल यांना अटक केली होती.