दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाने १ जूनपर्यंत जामीन मंजूर केला आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी त्यांना जामीन देण्यात आला आहे. काल केजरीवाल हे तुरुंगांतून बाहेर आले आहेत. त्यांनी बाहेर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ते भ्रष्टाचाराशी लढण्याचा दावा करत आहे मात्र सर्व चोर त्यांच्या पक्षातच आहेत असा आरोप केजरीवालांनी केला आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सत्तेवर आल्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आणि एमके स्टॅलिन यांच्यासह सर्व विरोधी नेत्यांना तुरूंगात पाठवले जाईल असा आरोप देखील केजरीवाल यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, ”ते विरोधी नेत्यांना तुरुंगांत पाठवतील आणि त्यांना संपवतील. आमचे मंत्री, हेमंत सोरेन, ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे मंत्री तुरुंगात आहेत. भाजपा पुन्हा विजयी झाल्यास ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन, आरजेडी नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री पिनराई विजयन, उद्धव ठाकरे हे विरोधी नेते तुरुंगात असतील.”
दरम्यान अरविंद केजरीवाल हे ईडी कोठडीत होते. २१ मार्च रोजी त्यांना ईडीने अटक केली होती. मात्र निवडणुकीचा काळ असल्याने त्यांना १ जूनपर्यंत काही अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. १ जून नंतर त्यांना पुन्हा एकदा सरेंडर करावे लागणार आहे. दिल्लीतील दारू घोटाळ्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली आहे.