भारतात ११ मे हा दिवस १९९८ साली राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस (National Technology Day) म्हणून घोषित केला. विज्ञान (Science) आणि तंत्रज्ञान (Technology) क्षेत्रात भारताचे योगदान आणि या क्षेत्रात भारताने केलेल्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस आहे. १९९८ मध्ये ११ आणि १३ मे रोजी भारताने अनेक भूमिगत अणुचाचण्या करून आपले वैज्ञानिक आणि तांत्रिक पराक्रम प्रदर्शित केले, ज्याचे नाव ऑपरेशन शक्ती!
११ मे १९९८ रोजी भारताने एरोस्पेस अभियंता आणि दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथील भारतीय लष्कराच्या पोखरण चाचणी क्षेत्रात शक्ती-I या आण्विक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे पार पाडली. दोन दिवसानंतर लगेचच, पोखरण-II / ऑपरेशन शक्ती पुढाकाराचा एक भाग म्हणून यशस्वीपणे आणखी दोन आण्विक चाचण्या घेतल्या. या चाचण्यांमुळे भारत राष्ट्रांच्या ‘न्यूक्लियर क्लब’ मध्ये सामील होणारा सहावा देश ठरला आणि नॉन-प्रोलीफरेशन ऑफ न्यूक्लियर वेपन तहामध्ये भागीदार नसलेला प्रथम देश बनला. या आण्विक चाचण्यांमुळे जगाला भारताची तंत्रज्ञानातील प्रगती दिसून आली. तसेच, ११ मे १९९८ रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) कडून ‘त्रिशूल’ क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी पूर्ण केली गेली. जे नंतर भारतीय लष्कर आणि भारतीय वायुसेनेत समाविष्ट करण्यात आले. कमी पल्ल्याचे, जलद-प्रतिक्रिया देणारे, जमिनीवरून हवेत मारा करणारे (SAM) क्षेपणास्त्र ‘त्रिशूल’ हा भारतातील एकात्मिक गाइडेड क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचा एक भाग होता.
देशाच्या या प्रचंड यशानंतर, भारताचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ११ मे हा दिवस ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ (National Technology Day) म्हणून घोषित केला. भारतात १९९९ सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास मंडळ (TDB) यांच्या नेतृत्वात हा दिवस साजरा केला जातो. आज याला २५ वर्षे पूर्ण झाली. देशाच्या विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच्या सन्मानार्थ आणि भावी पिढीतील विज्ञान – तंत्रज्ञान क्षेत्रातील अभियंते, संशोधक, तंत्रज्ञ आणि सहाय्यकांना प्रेरणादायी दिवस म्हणून राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस (National Technology Day) साजरा केला जातो.
संदर्भ – आंतरजालावरुन साभार
डॉ. सौ. शिल्पा जितेंद्र शिवभक्त
गार्गी शाखा, नाशिक
सौजन्य -समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र प्रांत