लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे ला ४ थ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दरम्यान देशभरात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेत आहेत. जास्तीत जास्त जागा जिकंण्यासाठी सर्वजण तयारी करत आहेत. दरम्यान या सर्व धामधुमीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजपा दक्षिण भारतात जास्त जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला. भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात (आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ) सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरेल, असे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री आज पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ते म्हणाले, ” तीन टप्प्यातील मतदानात भाजप प्रणित आघाडी असलेल्या एनडीएला सुमारे २०० जागा मिळाल्या आहेत. चौथा टप्पा आमच्यासाठी सर्वोत्तम असणार आहे. तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही मतदान होणार आहे आणि इथे भाजप आणि एनडीए क्लीन स्वीप करणार आहेत.”
एनडीए सरकारने यंदाच्या निवडणुकीत अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. ती घोषणा खरी ठरवण्यासाठी देशभरात जोरदार प्रचार केला जात आहे. १० वर्षांत केलेली विकासकामे लोकांसमोर ठेवली जात आहेत. त्यात प्रामुख्याने राम मंदिर, देशातील पसरलेले रस्त्यांचे जाळे, कलम ३७०, २५ कोटी लोकांना गरिबीतून मुक्त करणे अशी अनेक काम लोकांसमोर प्रचारसभांमधून ठेवली जात आहेत.