Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याने त्याच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अविस्मरणीय असे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही लाखोंच्या संख्येत आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते नेहमी आतुर असतात. पण आता अल्लू अर्जुन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. अल्लू अर्जुन हा अडचणीत सापडला असून त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
11 मे रोजी अल्लू अर्जुन त्याच्या एका आमदार मित्राला भेटण्यासाठी आंध्र प्रेदशातील नंदयाल येथे गेला होता. YSRCPचे आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी हे अल्लू अर्जुनचे मित्र असून त्यांना भेटण्यासाठी तो त्यांच्या राहत्या घरी आला होता. त्यामुळे अल्लूची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी रेड्डी यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली होती. यानंतर पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि आमदार शिल्पा रविचंद्र रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल केला.
. YSRCPचे आमदार शिल्पा रविचंद्र किशोर रेड्डी हे पुन्हा निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अल्लू अर्जुन रेड्डी यांच्या घरी त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आला होता. यादरम्यान चाहते अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी रेड्डी यांच्या घराबाहेर आले आणि त्यांनी ‘पुष्पा पुष्पा’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे पोलिसांनी अल्लू अर्जुन आणि रेड्डी यांच्यावर निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाचा गुन्हा दाखल केला आहे.
शिल्पा रविचंद्र रेड्डी यांनी आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन होईल हे जाणून आरओ नंद्याल यांच्या परवानगीशिवाय अल्लू अर्जुनला घरी बोलावले, असे तक्रारीमध्ये म्हटले आहे.