Hardik Pandya : काल (11 मे) झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा दारूण पराभव केला. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सची खराब कामगिरी शनिवारी ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध कायम राहिली.
पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा स्थितीत पहिल्या 7 चेंडूत फॉर्मात असलेले फिल सॉल्ट आणि सुनील नरेन बाद होऊनही केकेआरला निर्धारित 16 षटकांत 7 गडी गमावून 157 धावा करण्यात यश आले.
मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. 65 धावांवर पहिली विकेट गमावल्यानंतर मुंबई संघ 16 षटकात 8 विकेट गमावून 139 धावा करू शकला आणि 18 धावांच्या फरकाने सामना गमावला. मुंबई इंडियन्सला विजयासाठी शेवटच्या षटकात 22 धावा करायच्या होत्या पण हर्षित राणाने 2 बळी घेत त्यांना ते साध्य करू दिले नाही. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्स हा IPL 2024 मध्ये अधिकृतपणे प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला. तर मुंबई इंडियन्स संघ 13 सामन्यांतील 9व्या पराभवासह गुणतालिकेत नवव्या स्थानावर घसरला आहे.
कोलकात्याविरुद्धच्या पराभवाची निराशा मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पराभवावनंतर निराशा व्यक्त करत हार्दिक म्हणाला, पराभव पचवणे कठीण आहे. आम्ही फलंदाजीमध्ये चांगली सुरुवात केली होती पण त्याचा फायदा करता आला नाही आणि त्याची किंमत आम्हाला चुकवावी लागली.
खेळपट्टी थोडी अवघड होती त्यामुळे लय राखणे खूप गरजेचे होते. चांगल्या सुरुवातीचा फायदा उठवण्यात आम्हाला अपयश आले, असंही हार्दिक पंड्या म्हणाला.