Subodh Bhave : आज (13 मे) देशभरात 96 जागांसाठी म्हणजेच चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशात 96 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होत आहे.
राज्यातील नंदुरबार, जळगाव, बीड, अहमदनगर, पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर, रावेर, शिर्डी, मावळ, जालना या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झाले आहे. त्यामुळे आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर आज सकाळपासून लोकांच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. यामध्ये सामान्य जनतेसह अनेक कलाकार, राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये आता अभिनेता सुबोध भावेनं मतदानाचा हक्क बजावला आहे.
सुबोध भावेनं आज सकाळी पुण्याच मतदानाचे कर्तव्य पार पाडले. सुबोधनं त्याच्या पत्नीसह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर सुबोधनं जनतेला मोठं आवाहन केलं. “आयुष्यात मला पहिल्यांदा मतदान करायचा मिळालं होतं तेव्हा मला सर्वात जास्त आनंद झाला होता. तेव्हापासून मी कुठलीही निवडणूक असली तरी मी आणि माझ्या घरातले सर्वजण मतदान करतो. मतदान करणे हे आमचे प्रथम आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त घराबाहेर पडा असं मी मतदारांना आवाहन करतो. कारण जर तुम्ही ठरवलं तरच बदल घडू शकेल”, असं सुबोध भावे म्हणाला.
दरम्यान, 11 जागांमध्ये शिरूर, अहमदनगर , छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या जागांवर अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. अनेक राजकीय मंडळींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. जळगावमध्ये भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजवाला आहे. अहमगनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी देखील मतदान केले आहे. महायुतीच्या नेतृत्वात आम्ही राज्यात 45 जागा जिंकू असा विश्वास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला आहे.