Murlidhar Mohol : आज चौथ्या टप्प्यासाठी पुण्यात मतदान सुरू आहे. त्यामुशे आज सकाळपासून लोकांच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. यामध्ये सामान्य जनतेसह अनेक कलाकार, राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये आता पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मतदान केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना मतदाना करण्याचं आवाहन केलं. “मी पुणेकरांना आवाहन करेन की, आपल्या देशातील लोकशाही ही जगातील सर्वात श्रेष्ठ लोकशाही आहे आणि आपण या लोकशाहीचे एक भाग आहोत. त्यामुळे आपली लोकशाही समृद्ध करा आणि मतदान करा”, असं आवाहन मोहोळ यांनी केलं आहे.
दरम्यान, आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. देशभरात 96 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशात 96 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होत आहे. तर राज्यातील नंदुरबार, जळगाव, बीड, अहमदनगर, पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर, रावेर, शिर्डी, मावळ, जालना या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झाले आहे. त्यामुळे आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.