Pune Loksabha Election 2024 : आज लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. आज देशभरात 96 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. देशात 96 तर महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान होत आहे.
राज्यातील नंदुरबार, जळगाव, बीड, अहमदनगर, पुणे, शिरूर, छत्रपती संभाजीनगर, रावेर, शिर्डी, मावळ, जालना या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान सुरु झाले आहे. त्यामुळे आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे
आज पुण्यातही सकाळपासून मतदान सुरू आहे. पुण्यात लोक बाहेर पडत असून मोठ्या प्रमाणात मतदान करताना दिसत आहेत. पण अशातच आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मतदार यादीत नाव सापडत नसल्यामुळे मतदारांमध्ये मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार घडला आहे.
रामटेकडीत मतदार यादीमध्ये नाव सापडत नसल्यामुळे आणि काही नावे ही प्रभागाच्या बाहेर आल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसंच कोंढवा दरेकर शाळा आणि कात्रज हुजूरपागेसह इतर परिसरातील नावे मतदार यादीत सापडत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, तसेच मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
आज सकाळपासून लोकांच्या मतदानासाठी रांगा लागल्या आहेत. यामध्ये सामान्य जनतेसह अनेक कलाकार, राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.