PM Narendra Modi : 1 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान होणार आहे. पीएम मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढवणार आहेत. ते 14 मे रोजी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
14 मे रोजी होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या नामांकनाला मोठा कार्यक्रम करण्याची भाजपने तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 12 मुख्यमंत्री, 18 केंद्रीय मंत्री, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री, खासदार आणि आमदार एकता दर्शविण्यासाठी पीएम मोदींच्या नामांकनात सहभागी होणार आहेत. यासोबतच एनडीए आघाडीतील सर्व पक्षांचे नेतेही यामध्ये सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी वाराणसीमध्ये मेगा रोड शो करणार आहेत. पंतप्रधानांचा हा रोड शो अंदाजे 6 किमी लांबीचा रोड शो असणार आहे. तसेच त्यांचा हा रोड शो बनारस हिंदू विद्यापीठातून दुपारी 4 वाजता सुरू होईल आणि काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचल्यानंतर त्याची सांगता होईल. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या रोड शोसाठी 1 हजार किलो फुलांनी रस्ता सजवला जाणार आहे. यावेळी वाराणसीतील लोक त्यांचे स्वागतही करतील.
नामांकन करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथ मंदिरात विशेष पूजा करतील. यानंतर ते कालभैरव मंदिरात जाऊन विशेष पूजा करतील. तर पंतप्रधान मोदींचा रोड शो भव्यदिव्य करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शनिवारी वाराणसीला पोहोचले आहेत. दोन्ही नेते पीएम मोदींच्या रोड शो आणि नामांकनाच्या तयारीचा आढावा घेतील. यावेळी पंतप्रधान मोदी 20 तासांहून अधिक काळ वाराणसीमध्ये राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.