Amit Shah : आज देशात लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान सुरु आहे. या दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेअर बाजाराबाबत मोठे भाकीत केले आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान ते म्हणाले की, जर सरकार स्थिर असेल तर शेअर बाजार नक्कीच वर जाईल. मात्र, निवडणुका आणि शेअर बाजारातील घडामोडींचा संबंध जोडू नये, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एनडीटीव्हीशी बोलताना अमित शाह म्हणाले, “शेअर बाजारातील घसरणीचा निवडणुकीशी संबंध नसावा, परंतु तरीही अशी अफवा असेल तर मी तुम्हाला 4 जूनपूर्वी शेअर खरेदी करण्याचा सल्ला देतो. आम्ही 400 हून अधिक जागा जिंकणार आहोत आणि स्थिर मोदी सरकार सत्तेवर येईल. अशा स्थितीत शेअर बाजार निश्चितपणे वर जाईल.”
पुढे अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक करण्यासाठी मिळालेल्या निमंत्रणाची आठवण करून देत शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना विचारले की, तुम्ही राम मंदिर पाहण्यासाठी का गेला नाही, ते स्पष्ट करा. तसेच राहुल गांधींनी रायबरेलीच्या लोकांना सांगावे की, कलम 370 हटवण्याला तुमचा पाठिंबा आहे की नाही?, असंही अमित शाह म्हणाले.