पुणे लोकसभेसाठी आज मतदान होत असून सकाळपासूनच नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या तीन टप्प्यांमध्ये मतदानाचा आकडा घटलेला पाहायला मिळाला होता . त्यामुळे पुण्यात देखील अशीच परिस्थिती असेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. मात्र शहरामध्ये सकाळपासूनच मतदान केंद्रावर ती लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. सकाळी 11 पर्यंत पुण्यामध्ये 16.16 इतके मतदान झाले असून सर्वाधिक मतदान हे कोथरूड परिसरात झाले आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा त्रास आणि मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळालं. अनेक मतदान केंद्रावरती मतदार यादीतल्या घोळामुळे अनेकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले. याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला मोहोळ म्हणाले, मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य असून प्रत्येकाने ते पार पाडले पाहिजे. मी माझ्या कुटुंबाने हे कर्तव्य पार पडले आहे. पण पुण्यात निवडणूक याद्यांमध्ये प्रचंड घोळ आहे. निवडणूक आयोगाने याकडे कधीतरी लक्ष देऊन याद्या अपडेट करणे आवश्यक आहे. नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला आहे.