महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. सोमवारी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एका कमांडरसह तीन नक्षलवादी ठार झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून स्वयंचलित शस्त्रे जप्त केली आहेत. दरम्यान, पेरिमिली दलमचे काही सदस्य सध्याच्या टीसीओसी कालावधीत विध्वंसक कारवाया करण्याच्या उद्देशाने भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा गावाजवळील जंगल परिसरात तळ ठोकून असल्याची माहिती सोमवारी सकाळी पोलिसांना विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली होती. यानंतर, अतिरिक्त एसपी ऑपरेशन्स यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी 60 च्या दोन तुकड्या तातडीने परिसरात शोधण्यास निघाल्या होत्या.
छत्तीसगडमधील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पीडिया जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी आतापर्यंत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांमध्ये डीकेएसझेड, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरचे मोठे कॅडर मारले जाण्याची शक्यता आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख केली जात आहे. एसटीएफ आणि डीआरजीचे दोन जवान जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. काल रात्रीपासून सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरु आहे. या जंगलात सुरक्षा दलांनी मोठ्या नक्षलवाद्यांना घेरले असल्याचे कळते आहे. यामध्ये नक्षलवाद्यांचे अनेक कमांडर आणि टॉप कमांडर असण्याची शक्यता आहे.