पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून (Varanasi Lok Sabha Constituency) उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी वाराणसीत शहरात पोचले आणि त्यांनी दशस्वमेध घाटावर प्रार्थना केली. तसेच वाराणसीतील कालभैरव मंदिरातही पूजा केली. याबाबत माध्यमांशी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांचे काशी (वाराणसीचे दुसरे नाव) सोबतचे नाते अविभाज्य आणि अतुलनीय आहे. आपल्या एस पोस्टमध्ये, पीएम मोदींनी काशीबद्दलचे त्यांचे प्रेम आणि गेल्या काही वर्षांत गंगा नदीशी त्यांचे नाते कसे बहरले याबद्दल बोलताना त्यांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार पंतप्रधान मोदी यांनी आज थोड्या वेळापूर्वी वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात 1 जून रोजी वाराणसीमध्ये मतदान होणार आहे तर 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
पांढऱ्या चुरीदार आणि निळ्या जॅकेटसह पूर्ण बाह्यांचा पांढरा कुर्ता परिधान करून पंतप्रधान मोदी वाराणसीतील डीएम कार्यालयात पोहोचले त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यासह एकूण 25 एनडीए नेत्यांनी पंतप्रधानांच्या नामांकनासाठी हजेरी लावल्याचे दिसून आले .यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा हेही उपस्थित होते.
काल, पीएम मोदींनी वाराणसीमध्ये 5 किमी लांबीचा भव्य रोड शो केला, मोदी ज्या वाहनात उभे होते त्या वाहनाच्या पुढे मोठ्या संख्येने भगव्या पोशाखात महिला चालत होत्या. पंतप्रधान मोदींसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चौधरी भूपेंद्र सिंह होते. पंतप्रधानांचा जयजयकार करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा समर्थक आणि रहिवाशांचा मोठा जमाव जमल्याने संपूर्ण परिसर ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्री राम’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. .
वाराणसी मतदारसंघात रोहनिया, वाराणसी उत्तर, वाराणसी दक्षिण, वाराणसी कँट आणि सेवापुरी या पाच विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. वाराणसी हा भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान मोदींचा बालेकिल्ला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीतील ही सर्वाधिक अपेक्षित लढत असणार आहे. 2014 आणि 2019 या दोन्ही सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी प्रचंड बहुमताने हा मतदारसंघ जिंकला होता. .
यावेळी त्यांचा सामना काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्याशी आहे, जे पंतप्रधानांच्या विरोधात इंडिया आघाडीचे संयुक्त उमेदवार आहेत. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत यूपी काँग्रेसचे प्रमुख, राय यांनाच काँग्रेसने वाराणसीमध्ये पंतप्रधानांच्या विरोधात उभे केले होते, परंतु दोन्ही वेळा त्यांना
पराभवाचा सामना करावा लागला होता. अजय राय हे तिसऱ्यांदा लोकसभा लढतीत मोदींचा सामना करणार आहेत.