सध्या राज्यातील वातावरण सतत बदलत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. काल मुंबई, पुणे यांसह अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे आता मान्सून महाराष्ट्रात आणि देशभरात कधी दाखल होणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. दरम्यान हवामान विभागाने एक महत्वाचा अंदाज जाहीर केला आहे. त्या अंदाजानुसार १९ मे पर्यंत नैऋत्य मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. ८ ते ९ जून दरम्यान मान्सून कोकणात म्हणजेच महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
१९ मे पर्यंत नैऋत्य मौसमी वारे दक्षिण अंदमान-निकोबार भागात दाखल होतील. त्यानंतर नैऋत्य मौसमी वारे हे मान्सूनचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये दाखल होईल. मात्र केरळमध्ये मान्सून कधीपर्यंत दाखल होईल हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा येणारा मान्सून हा नेहमीपेक्षा अधिक असणार आहे. राज्यात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात राज्यात चांगला पाऊस होणार आहे. यंदाच्या मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक चांगली स्थिती असण्याची शक्यता आहे. ८ जूनपर्यंत मांसून येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.