छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी मोगल सिद्धी पोर्तुगीज या आणि अशा अनेक शत्रूंशी निकराचा लढा देऊन छत्रपती संभाजी महाराजांनी एक नवा इतिहास घडवला. देव, देश आणि धर्म यासाठी त्यांनी औरंगजेबाने केलेला छळ सहन केला.
औरंगजेबाने संभाजी महाराजांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला. पण औरंगजेबाला त्यात यश आले नाही. कुराणच्या शिकवणी नुसार काफीराला फक्त दोनच पर्याय असतात एक इस्लाम धर्माचा स्वीकार करणे किंवा मरणे. इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यास संभाजी महाराज राजे झाले नाही म्हणून औरंगजेबाने त्यांचा अतोनात शारीरिक छळ केला. पण तो छळ सहन करून संभाजी महाराजांनी आपली धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा व्यक्त करून हौतात्म्य स्वीकारले. आणि गीतेतील वचन प्रत्यक्ष कृतीत आणले. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीतेत सांगतात, “स्वधर्मे निधनं श्रेय: परधर्मो भयावह: ।” भावार्थ-भयानक फळ भोगायला लावणाऱ्या परधर्माचा स्वीकार करून जीवन जगण्यापेक्षा स्वतःच्या धर्मात राहून मरणे अधिक श्रेयस्कर आहे. असे गीतेतील वचन ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या जीवनात उतरवले, त्या संभाजी महाराजांना इतिहासकारांनी दूर्वर्तनी, व्यसनी आणि राजबुडव्या म्हणून उपेक्षिले ही खरी शोकांतिका आहे.
वास्तविक पाहता संभाजी महाराजांच्या चारित्र्याने एक वेगळीच जादू निर्माण केली. संभाजी महाराजांची हत्या ज्या पद्धतीने ज्या क्रौर्याने करण्यात आली ते लक्षात घेतले तर कोणताही व्यसनी माणूस अशा प्रकारचा छळ सहन करणार नाही. खरे पाहता व्यसनी माणूस दृढनिश्चयी असूच शकत नाही. ही गोष्ट कोणीही लक्षात घेतली नाही.
काही साहित्यिकांनी कल्पनेच्या भराऱ्या मारून संभाजी महाराजांच्या चरित्रात काही काल्पनिक घटना बेमालुमपणे घुसवल्या. त्या काल्पनिक गोष्टींना सत्याचा मुलामा देण्यात आला. साहित्यिकांनी रंगवलेली संभाजी महाराजांची प्रतिमा सर्वसामान्य जनतेने सत्य मानली.
कवी बी म्हणजे नारायण मुरलीधर गुप्ते यांनी कवितेत लिहिले शिवनेरीच्या किल्ल्यावर कमळ बुरुज आहे तो त्या थोरातांच्या कमळेची साक्ष देतो. वास्तविक शिवनेरीवर असा कोणताही बुरुज नाही. एवढेच नाही तर कमळा नावाची कोणतीही स्त्री अस्तित्वातच नाही. त्याचप्रमाणे तुळशी ही सुद्धा साहित्यिकांच्या कल्पनेतून निर्माण झालेली व्यक्तिरेखा आहे. या व्यक्तिरेखेचा इतिहासातील कोणत्याही तुळशी नावाच्या स्त्रीशी संबंध नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या कमळा आणि तुळशी या प्रेयसी होत्या अशा प्रकारची कथा सांगितली जाते तिला कोणताही ऐतिहासिक पुरावा आढळत नाही. साहित्यिकांच्या कल्पनेतून निर्माण झालेल्या या व्यक्तिरेखांमुळे छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र विकृत स्वरूपात जगासमोर आले. ही लांच्छनास्पद गोष्ट आहे.
इंग्रज इतिहासकार ग्रँड डफ याने वर्ष १८२६ मध्ये संभाजी महाराजांच्या जीवनावरचा एक ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचा पहिला मराठी अनुवाद कॅप्टन केपन डेव्हिड या एका इंग्रजांनी वर्ष १८२९ मध्ये केला. या इंग्रज माणसाने अनुवादित केलेला हा ग्रंथ त्यावेळी सर्व शाळेतल्या विद्यार्थ्यांनी वाचला. ग्रँड डफ याच्या या ग्रंथामुळे संभाजी महाराजांची विकृत प्रतिमा जगासमोर आली. हिंदुस्थानातल्या अनेक इतिहासकारांसमोर त्यावेळी हा ग्रंथ प्रमुख संदर्भ ग्रंथ म्हणून होता. त्याचप्रमाणे सर्व इतिहासकारांच्या हाती सभासदाची आणि मल्हारराव चिटणीस यांची बखर हा आणखीन एक संभाजी महाराजांच्या चरित्र लेखनासाठी असलेला स्रोत होता. या दोन्ही बखरीच संभाजी महाराजांची माहिती देणारे स्त्रो इतिहासकारांच्या हातीशी होते. अशाप्रकारे इतिहासकारांच्या हाती माहितीचा चुकीचा स्रोत लागला त्यामुळे चुकीच्या स्रोतावर किंवा चुकीच्या माहितीवर आधारित असलेला आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्र्याचे हनन करणारा विकृत इतिहास जगासमोर मांडला गेला. लेखाची मर्यादा लक्षात घेऊन केवळ मल्हारराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीचा दाखला देतो.
मल्हार रामराव चिटणीस हा खंडोबा चिटणीस याचा पणतू! सातारकर दुसरे शाहू महाराज यांच्या पदरी हा मल्हारराव चिटणीस पदावर होता. चिटणीसाची बखर संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १२२ वर्षांनी लिहिण्यात आली. संभाजी महाराजांवर जी स्वतंत्र असलेली ही एकमेव बखर आहे. त्यामुळे इतिहासकारांनी या बखरीवर विश्वास ठेवला.
छत्रपती संभाजी महाराजांची सर्वात जास्त बदनामी करणारा बखरकार म्हणजे मल्हार रामराव चिटणीस होय. त्याच्या बखरीतल्या लिखाणाचा प्रभा एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातल्या इतिहासकारांवर झाला. त्याने असे कपोल कल्पित अतिरंजित आणि विकृत लिखाण करण्यामागचे कारण आपण जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
मल्हाररावाचा खापर पणजोबा म्हणजे बाळाजी आवजी चिटणीस याला संभाजी महाराजांनी देशद्रोह केला म्हणून आणि संभाजी महाराजांना मारण्याच्या कटात तो सहभागी होता म्हणून हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. याचा राग मनात ठेवून या मल्हार रामराव चिटणीस ने विकृतीने भरलेली संभाजी महाराजांची बखर लिहिली.
संभाजी महाराजांची बदनामी करताना मल्हाररावची लेखणी जराही विचलित झाली नाही. संभाजी महाराजांविषयी असलेला कडवटपणा त्याच्या लेखणीतून ओसंडून वाहताना दिसतो. पण बाळाजी आवजी आणि खंडोबा या आपल्या पूर्वजांची प्रतिमा उजळून टाकण्यासाठी मात्र याची लेखणी मात्र मधाळलेली दिसते.
वास्तविक संभाजी महाराजांना छत्रपती पद मिळू नये म्हणून जी कटकारस्थाने करण्यात आली बखरकाराचा खापर पणजोबा बाळाजी आवजी चिटणीस सहभागी होता. त्याने संभाजी महाराजांवर विषप्रयोग करण्याच्या गटात सहभागी होता. शत्रूशी संगनमत करून जे कारस्थान रचले त्यात त्याचा सहभाग होता. अशा कोणत्याही गोष्टींची नोंद मल्हारने त्याच्या बखरीत केलेली आढळत नाही. मात्र शिवाजी महाराज, शंभूराजे आणि राजाराम महाराज या तिन्ही राज्यकर्त्यांशी आपले पूर्वज कसे एकनिष्ठ होते आणि त्यांनी कशी कर्तबगारी दाखवली याचे वर्णन मात्र त्याने झोकात केले आहे.
संभाजी महाराजांची बदनामी करणारा इतिहास खोडून खरा इतिहास जगासमोर आणण्यासाठी वा.सी.बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचे संशोधन करण्यासाठी छत्रपती संभाजी चरित्र कार्यालय लिमिटेड या नावाची एक संस्था स्थापन केली. तेव्हापासून संभाजी महाराजांच्या संदर्भातले लेख माहिती साधने सातत्याने प्रसिद्ध करण्याचे काम त्यांनी केले. देशा विदेशातून अत्यंत कष्टाने त्यांनी ऐतिहासिक माहिती संकलित केली. त्यांच्या या अपार कष्टातून खरी माहिती आज आपल्याला उपलब्ध झाली. बखरकारांनी संभाजी महाराजांवर जो अन्याय केला त्यांचे चरित्र विकृत स्वरूपात जगापुढे मांडले याची जाणीव महाराष्ट्रातल्या अभ्यासकांना झाली.
या जाणिवेचा पुरावा म्हणजे दत्तो वामन पोतदार यांनी संभाजी महाराजांवर एक लेख लिहिला. त्या लेखात ते लिहितात…
“संभाजी सारख्या शूर-पुर्वजाचे स्मरण पारतंत्र्यातील गारठलेल्या मनाला उत्साहाची उब देणारे ठरते. भाऊसाहेब पवारांनी ही संभाजी चरित्रा पासून देशवासीयांनी प्रेरणा घेऊन देशासाठी आत्मयज्ञ करण्याची तयारी ठेवा. असा संदेश दिला होता त्यावरून भिन्न भिन्न क्षेत्रात कार्य करणारी त्या काळातील महाराष्ट्रातील विचारवंत मंडळी संभाजी चरित्र या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला स्फूर्ती देणारा इतिहासाचा ठेवा आहे असे मानत होती.”
छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी आणि पराक्रमाविषयी फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे लिहितात…
“शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याचे विभाग करून शेजारच्या सर्व शत्रूंवर एकाच वेळी हल्ला चढवला. शत्रू सैन्यास त्यांच्याच मुलखात गुंतवून ठेवले. या मागचा हेतू हा होता की शत्रूने आपल्या प्रांतात येऊन चढाई करू नये. शिवरायांनी सर्वात शूर अशा दहा सहस्र सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता. हा मुलगा लहान असला तरी धैर्यशील आहे. आपल्या वडिलांच्या कीर्तीला साजेल असाच शूर आहे. शिवरायांप्रमाणेच हा मुलगा युद्ध कलेत तरबेज आहे. मजबूत बांधण्याचा हा शिवपुत्र रूपवान आहे. त्याच्या सौंदर्यामुळे आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वामुळे त्याचे सैनिक त्याच्याकडे आकर्षित होतात. त्याच्या सैन्याचा त्याच्यावर जीव आहे. शिवरायांप्रमाणेच ते त्यालाही मान देतात. त्याच्याविषयी मनात आदर बाळगतात. सैनिकांना शंभूराजांच्या मार्गदर्शनाखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते. एखाद्या सैनिकाने काही कर्तबदारी करून दाखवली तर हा युवराज लगेच त्याची दखल घेऊन त्याचे कौतुक करतो त्याला बक्षीस देतो गुणग्राहकता हा विशेष गुण युवराज शंभूमध्ये आहे.”
शंभुराज हे लढवय्ये आणि शूरवीर असले तरी त्यांना संस्कृत भाषेची उत्तम जाण होती. बुधभूषण हा राजनीतीवर आधारित असलेला संस्कृत भाषेतला त्यांचा ग्रंथ आजही मार्गदर्शन करणारा आहे. ब्रजभाषेत ‘नायिका भेद’ आणि ‘नखशिख’ या नावाचे दोन ग्रंथ संभाजी महाराजांच्या लेखणीतून साकारले आहेत. हे दोन्ही ग्रंथ शृंगार शास्त्राला वाहिलेले आहे. युद्धशास्त्र शृंगार शास्त्र या विषयांवर ग्रंथरचना करणाऱ्या संभाजी महाराजांनी अध्यात्म शास्त्रावरचा ‘सातसतक’ या नावाचा ग्रंथ लिहिला. त्यांच्या ग्रंथ संपदेतील हा ग्रंथ म्हणजे गौरीशंकर आहे.
संभाजी महाराज हे विद्वान होते, रसिक होते, राजनीति तज्ञ होते, रणधुरंधर होते मुत्सद्दी होते, अध्यात्मवादी होते. आजच्या त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांचे हे पुण्यस्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया.
– दुर्गेश जयवंत परुळकर
व्याख्याते आणि लेखक