केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आई राजमाता माधवी राजे सिंधिया यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या 70 वर्षांच्या होत्या. गेल्या तीन महिन्यांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजमाता माधवी राजे या नेपाळच्या राजघराण्यातील होत्या. त्यांचे आजोबा जुद्द शमशेर बहादूर नेपाळचे पंतप्रधान होते. ते राणा घराण्याचे प्रमुखही होते. माधवी राजे यांचा 1966 मध्ये माधवराव सिंधिया यांच्याशी विवाह झाला होता.माधवराव सिंधिया काँग्रेसचे दिग्गज नेते होते . 2001 मध्ये विमान अपघातात त्यांचे निधन झाले होते.
मार्च 2020 मध्ये, जेव्हा सिंधिया राजघराण्याचे प्रमुख ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत होते. पण त्यांच्या त्यांच्या निर्णयात मुलगा आणि पत्नी यांच्यासोबत त्यांची आई माधवी राजे सिंधिया यांनी त्यांना सर्वाधिक पाठिंबा दिला.
ज्योतिरादित्य यांना काँग्रेसमधला वडिलांचा वारसा सोडताना संकोच वाटत होता, पण माधवी राजे यांनी त्यांना मार्गदर्शक म्हणून मार्ग दाखवला. त्यानंतरच ज्योतिरादित्य यांनी आजी विजयाराजे सिंधिया यांच्यासारखा मोठा निर्णय घेत भाजपमध्ये प्रवेश केला.
सध्या ज्योतिरादित्य सिंधिया हे मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री असून गुना इथून लोकसभा निवडणूक लढत आहेत.