सुप्रीम कोर्टाने बुधवारी न्यूजक्लिकचे(News Click) संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ यांना परदेशी निधी प्रकरणी मुक्त केले. प्रबीर आणि न्यूज क्लिकचे एचआर प्रमुख अमित चक्रवर्ती यांना गेल्या वर्षी 3 ऑक्टोबर रोजी दिल्ली पोलिसांनी चीनकडून निधी घेतल्याच्या आरोपावरून अटक केली होती.
मात्र आज निकाल देताना न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती मेहता यांच्या खंडपीठाने प्रबीर पुरकायस्थ यांची दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत (यूएपीए) अटक अवैध असल्याचे सांगत त्यांची कोठडीतून सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत .
दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनुसार, न्यूज क्लिकवर चिनी प्रचाराचा आणि देशाचे सार्वभौमत्व धोक्यात आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. तसेच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक प्रक्रियेत व्यत्यय आणण्यासाठी पीपल्स अलायन्स फॉर डेमोक्रेसी अँड सेक्युलॅरिझमसोबत कट रचल्याचा आरोप पुरकायस्थ यांच्यावर आहे.
न्यूजक्लिक या वृत्त संकेतस्थळाने चीनकडून बेकायदा निधी घेतल्याचा आरोप आहे. तसेच चिनी प्रचारासाठी न्यूजक्लिकला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याचा आरोप आरोपपत्रात करण्यात आला होता. तसेच हा निधी अमेरिकेच्या मार्गाने पुरवण्यात आल्याचेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले होते.
दिल्ली पोलिसांनी, आपल्या सुमारे 8,000-पानांच्या आरोपपत्रात न्यूजक्लिक आणि त्याचे संस्थापक प्रबीर पुरकायस्थ यांना “टेरर फंडिंग” आणि विविध परिस्थितीत भारतात चिनी प्रचाराचा प्रसार केल्याबद्दल दोषी सिद्ध केले होते. तसेच करण्यात आलेल्या धक्कादायक खुलाशांमध्ये, चार्जशीटमध्ये 2020 च्या दिल्ली दंगली आणि शेतकऱ्यांच्या निषेधाच्या उद्देशाने पुरकायस्थने चीनकडून निधी ओतण्याचा तपशील उघड करण्यात आला होता.
दरम्यान आता सर्वोच्च न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यूजक्लिकच्या संस्थापकाची अटक आणि त्यानंतर त्यांना झालेली कोठडी बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. रिमांडपूर्वी अटकेचे कारण त्यांना किंवा त्यांच्या वकिलांना सांगितले नव्हते, असेही निरिक्षण न्यायालयाचे नोंदवले आहे.